पुणे : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले नऊ दिवसांचे उपोषण अखेर सोडले. यादरम्यान, जरांगे यांची प्रकृती खालावली असून, त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. आज त्यांची पत्नी, मुलगी आणि लहान बहिणीने सोलापूर येथील तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दर्शन घेत आई भवानीला साकडे घातले. सरकारदरबारी दाखल झालेला मराठा आरक्षणाचा तिढा लवकर सुटावा आणि आरक्षण मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करत वडीलांची तब्येत लवकरच ठणठणीत होऊ दे, आमच्या लढ्याला यश मिळू दे, अशी प्रार्थना जरांगे यांची मुलगी पल्लवी जरांगे हीने देवीकडे केली.
मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण मिळावे यासाठी निर्णय घेण्यासाठी २ जानेवारीपर्यंतचा वेळ मनोज जरांगे यांनी दिला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरुच रहाणार आहे. आज जरांगे यांची कन्या, पत्नी आणि त्यांची धाकट्या बहिणीने तुळजापूरच्या भवानीमातेचे दर्शन घेतले. यावेळी देवीची कवड्यांची माळ, देवीची साडी चोळी हार देऊन पुजारी विशाल आणि सचिन रोचकरी यांनी जरांगे यांच्या कुटुंबाचा सत्कार केला. यावेळी जरांगेच्या कुटुंबियांनी तुळजापुरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांना निवेदन देत मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली.
दरम्यान, पल्लवी हीने वडीलांची अजून भेट झाली नसल्याचे सांगितले. पल्लवी जरांगे पाटील म्हणाली की, माझ्या वडीलांनी २०-२५ वर्षे आरक्षणासाठी लढा दिला आहे. त्यांच्या लढ्याला नक्की यश येईल. माझं देवीकडे एकच मागणं आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळू दे. आमच्या लढ्याला यश मिळू दे, असे त्यांच्या पत्नीने सांगितले. लहान बहीणीने देखील भावाच्या कार्यात यश मिळावे म्हणून देवीच्या चरणी साकडे घातले.