जालना: “महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही सभा होऊ देणार नाही”, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. “फक्त नाटकं सुरु आहे. तुम्हाला आम्ही मराठे सोपे वाटतात का?” असा सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे यांचं चौथ्या दिवशीसुद्धा उपोषण सुरु आहे. त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना सरकारकडून उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात आहे. परंतु, ते उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत.
जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आज मंगळवारी विभागीय आयुक्त मधुकर राजे अरदड, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आले होते. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्याचे आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु, जरांगे उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत. याउलट त्यांनी राज्य सरकारला पंतप्रधान मोदींची एकही सभा होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. “काय नुसतं चाललं आहे, मजा चालली आहे. तुम्हाला मराठ्यांना खेटायचंय? बेसावध राहू नका. महाराष्ट्रात आम्ही पंतप्रधानांच्या सभा होऊ देणार नाहीत”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांचा घोटाळा तुम्ही मागे घेतला. पाच महिने झाले प्रक्रिया सुरू असून तुम्हाला राज्य शांत बघायचे नाही. पाच महिन्यांपासून केवळ प्रक्रिया सुरू आहे. आम्हाला पण पोलिसांच्या विरोधात बीड आणि राज्यभर केस करायच्या आहेत. आमचेसुद्धा डोके फोडले आहेत. आम्हाला दोन हजार पोलिसांवर गुन्हे दाखल करायचे आहेत”, असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“शिंदे, फडवणीस आणि पवार काय सरकार चालवत आहेत? सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी, हैदराबाद गॅझेट आणि शिंदे समितीला एक वर्ष मुदत देत असाल तरच आमच्याकडे या. तुम्ही 15, 16 तारखेनंतर मजा बघा. दोन दिवसांत अधिवेशन घेणार होते. ते घेतलं का? डबल रोल करू नका. मराठे काय आहेत ते तुम्ही 15, 16 तारखेनंतर बघा”, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.