‘तो येवलावाला काड्या करतोय, राजकीय करिअर उद्ध्वस्त करेल’; जरांगे पाटलांचा भुजबळांना गंभीर इशारा
जालना : भुजबळ अनेक दिवसांपासून मराठा नोंदी रद्द करा असे म्हणत आहे. मंडल आयोगाने दिलेल्या आरक्षणाव्यतिरिक्त दिलेले आरक्षण रद्द करा. मंडल आयोगाने दिलेले आरक्षण ही रद्द करा. त्याने टोळी तयार केली आहे. सोळा टक्के आरक्षण तुम्ही कसे घेतलं ते आता दाखवतो. येवलावाल्याची नियत काय आहे हे समजले. ओबीसी आंदोलक आमचे विरोधकच नाहीत. तो येवलावाला काड्या करत आहे, अशी जहरी टीका छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
तसेच लक्ष्मण हाकेंना भुजबळांनीच उभे केले आहे. ओबीसी आंदोलन भुजबळांनीच उभे केले. मी हाकेंना दोषच देत नाही, यामागे छगन भुजबळच आहेत. जातीयवाद मी नाही तर येवलावाल्याने सुरु केला आहे, तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन, असा इशाराचं मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचं नाव न घेता दिला आहे. मनोज जरांगे यांना आज डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे बोलताना म्हणाले, ओबीसी लोकांचे वाटोळं मला करायचं नाही. मंडळ आयोग रद्द होते आणि चॅलेंज देखील होते. जातीयवाद कसा असतो ते ओबीसी नेत्यांकडून पाहायला मिळत आहे. मराठा समाजाबद्दल यांची नियत काय आहे ते दिसले. ओबीसी ७० वर्षांपासून बोगस आरक्षण खात आहेत. आज गरीब लोकांना मिळत आहे, तर यांना वाईट वाटत आहे. त्यांचे विचार उघडे पडले. लक्ष्मण हाके किती जातीयवादी आहेत हे कळले. लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर ओबीसी नेते गप्प का? असा सवाल उपस्थित करत म्हणाले, आता मराठा नेत्यांवर टीका करणे कमी करा, असे आवाहनही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केले.