मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, त्यांना वेगळं आरक्षण द्यावं, अशी भूमिका भुजबळ यांनी घेतली आहे. तसेच त्यांनी जालन्यातील अंबड येथील सभेतून मनोज जरांगे पाटील यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला होता.
त्यानंतर बीड येथे झालेल्या जाळपोळीवरून छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. बीडचा हिंसाचार मनोज जरांगे यांनीच घडवून आणला असल्याचा आरोप देखील छगन भुजबळ यांनी केला आहे. भुजबळांनी केलेल्या आरोपाला मनोज जरांगेंनी उत्तर दिलं आहे. मंत्री छगन भुजबळ हे पागल झालेल्या माणसासारखं दर तासाला आपली भूमिका बदलतात, अशी खोचक टीका जरांगेंनी केली. ते छत्रपती संभाजीनगर येथे ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
बीडमधील हिंसाचाराबाबत छगन भुजबळांनी केलेल्या आरोपांबाबत विचारलं असता मनोज जरांगे म्हणाले, “ते काहीही बोलतात. त्यांना महत्त्व देण्याची अजिबात गरज नाही. ते एखाद्या पागल झालेल्या माणसासारखं दर तासाला आपली भूमिका बदलतात. त्यांचेच लोक येऊन हॉटेल जाळतात आणि हे इतर लोकांचं नाव घेतात. आता त्यांच्याबद्दल कोणतीही आस्था राहिली नाही. त्यामुळे त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही. कारण तो खूप उंचीचा माणूस होता, पण त्यांनी स्वत:चा कचरा करून घेतला.” असं देखी जरांगे यांनी म्हटलं आहे.