Manoj Jarange : छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे 20 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. आता मुंबई दौरा कसा असणार याची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. सकाळी 9 वाजताआंतरवाली सराटी- अहमदनगर-पुणेमार्गे मुंबईला पायी दिंडी निघणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
पायी दिंडीचा मार्ग
मनोज जरांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जालना,शहागड, गेवराई (बीड), अहमदनगर, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खराडी, शिवाजीनगर, पुणे अशी दिंडी असेल. त्यानंतर पुढे पुणे, मुंबई हायवे, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे आझाद मैदानावर ही पायी दिंडी पोहचणार आहे. दिंडीच्या आसपासच्या गावातली लोकं त्या-त्या ठिकाणी दिंडीत सहभागी होतील. सगळ्या नियोजनाचं पीडीएफ तयार करून कार्यकर्त्यांना व्हॉट्सॅपच्या माध्यमातून पाठवणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे.
मनोज जरांगेंच्या सूचना
“शांतेत दिंडी असेल, फोटो काढण्यासाठी गर्दी करू नका, ज्या तुकडीत तुम्हाला दिलं आहे त्याच तुकडीत राहा, आपल्या प्रत्येक गाडीत दोन समन्वयक ठेवावे. मुंबईला जाणाऱ्या सर्व लोकांना रस्त्यात लागणाऱ्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करावी. जे वाहन सोबत असणार आहे त्याला घरासारखं बनवावे. तसेच, आपापल्या तुकडीत कोण आहे त्यावर लक्ष ठेवा. कोण वेडंवाकडं शिरतंय का त्यावर लक्ष द्या. अर्धा क्विंटल ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ सोबत घ्यावे. टॉर्च, मोबाईल चार्जर, कपडे, साबण, दूध पावडर, सरपण, तवा, पातेलं सर्वकाही सोबत घेऊन चला, ऊसतोड करायला चाललो समजून सर्व संसार सोबत घ्या, असे अवाहन जरांगे यांनी केले आहे.