Maratha Reservation: छत्रपती संभाजीनगर: एकनाथ शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मराठा आरक्षणाचं वादळ एकदम अचानक कसं आलं? असा प्रश्न सावंत यांनी विचारला आहे. तसेच राज्य सरकारची दमछाक करून लगेच आरक्षण द्या, कागदावरच लिहून द्या, अशी भूमिका घेतली जात आहे, अशा शब्दांत मंत्री सावंतांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. यावर मनोज जरांगे पाटलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा समाजाच्या आंदोलनाचं वादळ अचानक कसं काय आलं? तानाजी सावंतांच्या या विधानाबद्दल विचारलं असता मनोज जरांगे पाटील म्हणाले, “ते नक्की काय बोलले, हे मी ऐकलं नाही. पण तानाजी सावंत नक्की कसलं वादळ दिसलं, हे मला माहीत नाही. पण आमच्या मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं होतंय, हे एकदम खरं आहे. जर त्याला कुणी वादळ समजत असतील आणि त्याविषयी असं बोलत असतील तर ही मराठा समाजासाठी मोठी शोकांतिका आहे. मराठा समाजातील नेत्यांना आपल्या समाजाविषयी प्रेम असलं पाहिजे. सावंत यांनी एकदा गरीबांच्या घरात जाऊन बघावं. गरीबांचं प्रेम काय असतं? त्यांना अडचणी काय असतात, त्यांच्या वेदना काय ? हे सर्व त्यांना कळेल.
कागदावर लिहून द्या, अशी भूमिका घेतली जाते, पण आरक्षण टिकणं महत्त्वाचं आहे, या सावंतांच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता जरांगे पाटील पुढे म्हणाले, “आरक्षण कसं द्यायचं, ते राज्य सरकारला कळतं. तुम्ही काही ज्ञान पागळण्याची आवश्यकता नाही. आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं, हे सरकारला कळतं आणि आरक्षण घ्यायचं की नाही, हे मराठ्यांना व्यवस्थित कळतं. मराठ्यांना वेड्यात काढून स्वत: खूप शहाणे आहेत, असं दाखवायची अजिबात गरज नाही.” (Maratha Reservation)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. पण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात का टिकवता आलं नाही? असं प्रश्नही मंत्री तानाजी सावंत यांनी विचारला होता. यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “ते तुम्हीच विचारा ना. तुम्हाला फक्त बाकीच्या गप्पा मारता येतात का? तेही बघा ना जरा. तुमच्या श्रीमंतीची शायनिंग मराठ्यांजवळ दाखवायची नाही. तुमच्याजवळच ती ठेवायची. ही मस्ती तिकडेच दाखवायची. मराठा आरक्षण का टिकलं नाही, याचा शोध तुम्हीच घ्यावा आणि मराठा समाजाला सांगावं, असं देखील जरांगे पाटील म्हणाले. (Maratha Reservation)