बीड : बीड जिल्ह्यातील नारायण गडावर यंदा पहिल्यांदाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तब्बल ५०० एकरात झालेल्या या सभेला राज्यभरातून लाखो मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच अग बया बया बया.. असे म्हणत नारायण गडावर नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी असल्याचं म्हटलं आहे. तसेच मी आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होतो, असेही ते यावेळी म्हणाले.
नारायण गडावर मनोज जरांगेंची तोफ धडाडली
नारायणगडावरील मेळाव्याला मैदान फुल्ल भरलं असून काही तासांपूर्वी बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी ते नारायणगड अशी 30 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बीडकडे येणाऱ्या चारही मार्गावर चक्का जाम झाला आहे. नारायण गडावरील मैदान मेळाव्यासाठी आलेल्या गर्दीने फुलून गेलंय. मला खरंच वाटलं नव्हतं की, नजर फिरेल इथपर्यंत तुम्ही येताल. एकजण म्हणत होता, हाहहाहा 500 एकर असतंय का? पण, गर्दी पाहून त्यांचा कार्यक्रमच होईल, अशी मिश्किल टिप्पणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
मीडियाच्या बांधवांनी जरा गर्दीकडे कॅमेरे फिरवावेत, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मेळाव्यासाठी जमलेल्या गर्दीवरुनच ओबीसीमधील काही नेत्यांना व राज्य सरकारला इशारा दिला आहे. बीडच्या पाठीमागे सगळे रस्ते जाम झाले आहेत. 500 एकर परिसरात सगळं मैदान भरलं आहे. मी तुमच्यासमोर आज नतमस्तक होतो, एवढी गर्दी पाहून, नजर जाईल तिथपर्यंत मराठ्यांचा समुद्रच आहे, असंही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटंल आहे.
यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, छत्रपतीच्या मावळ्याने त्यांचे विचार घेऊन उठाव करावा लागतो. आपलाही नाइलाज आहे. इच्छा नसतानाही अडवणूक होणार असेल तर माय बापांनो तुम्हालाही उठाव करावाच लागणार आहे. मी तर काय केलं. माझ्या समाजानेही काही केलं नाही आमच्या वाट्याला का अन्याय आला? आम्ही काय पाप केले? आमच्या समुदायाच्या पाठीमागे फक्त अन्याय आलाय. माझा समाज, या राज्यातील जनतेसाठी झिजलाय, असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
मराठा समाजाचा एवढा द्वेष का : मनोज जरांगे
राज्य सरकारने 14 महिन्यात एकही मागणी मान्य केली नाही, उभा राहण्याचे दिवस जवळ आले आहेत, काहीही होऊ शकते वेळेवर काहीही ठरवलं तर त्यावर चालायचं. तसेच, मराठा समाजाचा एवढा द्वेष का? आता 17 जाती घालताना गोरगरीब ओबीसींचा विचार का केला नाही.
आधीच भरपूर असल्याने तुम्ही येऊ नका म्हणतात, तुम्ही काल मोठ्या 17 जाती ओबीसी आरक्षणात घातल्या, आता तुमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. एकजण म्हणाला महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, मगच आरक्षण देतो. आता 17 जाती घालताना तुम्ही महाविकास आघाडीकडून लिहून घेतले का?, असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला.