जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषाचा रोग झाल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केली होती. आता लाड यांच्यावर पलटवार करत जरांगे यांनी शेलक्या शब्दात टीका केली. ‘माझ्या नादी लागू नका, तू किती पैसेवाला आणि करप्ट आहेस, हे सांगायला लाऊ नको, तू जात विकून घर मोठं करणारा आहेस, असं मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना सुनावले आहे. देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांच्या जीवावर मोठे होऊन, ते आता मराठे आमदार आणि मंत्री मराठ्यांच्याच अंगावर घालत मजा बघत असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी यावेळी केला.
मराठा आरक्षणावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. मनोज जरांगे यांना डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषाचा रोग झाल्याची टीका त्यांनी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील चांगलेच संतापले. ते म्हणाले की, हा कोण बांडगुळ आला आहे आता? तू माझ्या नादाला लागू नको, तू किती पैसेवाला आणि किती करप्ट आहेस, हे सांगायला लावू नकोस. तू जात विकून आपलं घर मोठं करणारी औलाद आहेस. मी तुला काही तरी म्हटलं आहे का? तू देवेंद्र फडणवीस यांचे पाय चाट नाहीतर काही कर, पण आमच्या नादी लागू नकोस, असं देखील जरांगे यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजातील मुलांचे वाटोळे केल्याचा जाब प्रसाद लाड यांनी विचारावा असे म्हणत जरांगे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात झालेल्या पोलिस भरतीत तिथल्या पोलीस अधीक्षकांनी कुणबी सर्टिफिकेट असलेल्या 400 ते 500 मुलांना बाहेर काढलं आणि ओपनमध्ये कॅटेगरीमध्ये टाकले. या गोष्टीवर प्रसाद लाडने देवेंद्र फडणवीसांना जाब विचारला पाहिजे. ओपन कॅटेगरीमध्ये जा, नाहीतर रिजेक्ट करतो अशी धमकी ठाण्याच्या एसपी यांनी दिली आहे. मग कशाला कुणबी प्रमाणपत्र दिले आहे? प्रमाणपत्र नसणाऱ्यांना तुम्ही आतमध्ये घेत आहात. अनेक भंगार लोक आयएएस अधिकारी झाले आहेत. परंतु, प्रमाणपत्र असणाऱ्यांना बाहेर काढले गेले. तुला लई प्रेम असेल तर देवेंद्र फडणवीसांसोबत लग्न कर. माझ्या मुलांचे वाटोळे झाले आहे, त्याचा जाब विचार, अशी टीका लाड यांच्यावर जरांगे यांनी केली आहे.
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, राज्यात शांतता नांदली पाहिजे, म्हणून मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. आता पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राचा दौरा ठरवण्यात येत आहे. 7 ऑगस्टला सोलापूरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिकमध्ये शांतता रॅली होणार आहेत.मराठ्यांनी सहकुटुंब शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावे. 20 तारखेला मी आमरण उपोषणाला बसणार आहे, असं देखील जरांगे पाटील म्हणाले.