नांदेड : जुन्या भांडणाच्या वादातून तीन युवकांनी एका ३५ वर्षीय व्यक्तीचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. वजिराबाद पोलीसांनी कारवाई करीत यातील तीन आरोपींना अटक केली आहे. ही घटना वजिराबाद पोलीस ठाण्यासमोरील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या मैदानात सोमवार दि.१३ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेतील मयताचे नाव संदीप गंगाराम मेटकर (३५, रा. नांदेड शहर) असे आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहीतीनुसार, वजिराबाद पोलीस ठाण्याच्यासमोरील महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या मैदानात म्हणजेच या मोकळ्या जागेत दररोज अनेकजण दारु पिण्यासाठी बसत असतात. ही बाब पोलिस प्रशासनापासून लपून राहिली नाही. याबाबत बऱ्याच बातम्या शहरातील विविध दैनिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत.
या मैदानात सोमवारी दि १३ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास संदीप गंगाराम मेटकर (३५), सुनिल मेटकर, दिनेश मेटकर आणि लक्ष्मण पवार हे सर्व दारु पित बसलेल होते. दारू पित असतानाच जुन्या भांडणाचा विषय निघाला आणि हा विषय पुढे वाढतच गेला. या भांडणात पुढे सुनिल मेटकर, दिनेश मेटकर आणि लक्ष्मण पवार या तिघांनी मिळून संदीप मेटकरला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यात त्याचा खून झाला. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर अधिक तपास करीत आहेत. वजिराबाद पोलीसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणातील तिघांना जेरबंद केले.