बीड : बीड जिल्ह्यातील केज येथील बहुचर्चित विलास घुले हत्या प्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. या प्रकरणातील पीडित महिलेने गंभीर आरोप करत आपल्यावर लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्यामुळेच हे प्रकरण घडल्याचा दावा केला आहे. (Vilas Ghule Murder Case)

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, विलास घुलेचा मित्र उमेश माने याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. या घटनेचे आक्षेपार्ह व्हिडिओही त्याने चित्रीत केले. त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिला वारंवार ब्लॅकमेल केले आणि पुन्हा तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने संपूर्ण घटना आपल्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर कुटुंबीय पोलिसांत तक्रार देण्यासाठी जात असताना त्यांना धमकावण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तक्रार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी मिळाल्याने भीतीपोटी कुटुंबाने पोलिसांत जाणे टाळल्याचे महिलेने सांगितले.
महिलेच्या म्हणण्यानुसार, त्यानंतरही तिचा छळ थांबला नाही. उमेश माने आणि विलास घुले वारंवार तिच्या घराजवळ येऊन त्रास देत होते. 3 जून रोजी विलास घुलेने तिला गाठून पूर्वीप्रमाणे संबंध ठेवण्यास नकार दिल्यास तिच्या पतीला आणि मुलांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तिने केला आहे.
20 जून रोजी आरोपी पुन्हा तिच्या घरासमोर येऊन शिवीगाळ आणि धमक्या देत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या वाढत्या त्रासामुळेच कुटुंबीय त्यांच्याशी बोलण्यासाठी गेले असता वाद झाला आणि त्यानंतर विलास घुलेचा मृत्यू झाल्याचे महिलेने सांगितले.
पीडित महिलेने केज आणि बीड येथे पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.







