बेंगळुरू: बेंगळुरू शहरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नासाठी नकार दिल्याच्या कारणावरून एका २३ वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या केली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अंजली असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणात पोलिसांनी आरोपी राजीवला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजली आणि राजीव गेल्या ३ ते ४ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. दोघांची भेट कामाच्या ठिकाणी झाली होती आणि कालांतराने त्यांचे प्रेमसंबंध जुळले. राजीव लग्नासाठी अंजलीवर वारंवार दबाव टाकत होता, मात्र अंजलीच्या घरच्यांचा या नात्याला तीव्र विरोध होता. कुटुंबीयांच्या दबावामुळे अंजलीने राजीवपासून अंतर राखण्यास सुरुवात केली होती आणि लग्नास स्पष्ट नकार दिला होता.

रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास राजीवने अंजलीला जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावले. जेवण सुरू असताना त्याने पुन्हा एकदा लग्नाचा विषय काढला, ज्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका वाढला की, अंजली तिथून निघून जाण्यासाठी उठली. याच वेळी संतापलेल्या राजीवने स्वयंपाकघरातील चाकू उचलला आणि तिच्या मानेवर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली अंजली रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळीच कोसळली.
आवाजामुळे परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी जखमी अंजलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी राजीवला ताब्यात घेतले. अंजलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी एमएस रमय्या रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







