धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावर घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांसह किल्ल्यावरील खोल दरीत उडी घेतल्याची घटना समोर आली. या घटनेत कुस्तीपटू अश्विनी पौळ आणि साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा मृत्यू झाला तर अडीच वर्षांची क्रांती हिची प्रकृती उपचारादरम्यान खालावली आणि तिचा मृत्यू झाला. दुसरी जुळी मुलगी वीरावर सध्या उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर अश्विनी पौळ या कुस्तीपटू होत्या. कुस्तीच्या क्षेत्रात त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदके मिळवली होती. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणूनही ओळख मिळाली होती.

अश्विनी मुंबईतील ‘MSF’मध्ये नोकरी करत होत्या. त्यांचे पती मनोहर पौळ हे रिक्षा चालवत असल्याची माहिती आहे. पतीच्या सांगण्यावरून अश्विनी यांनी सुमारे 4 ते 5 महिन्यांपूर्वी नोकरी सोडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्या गेल्या 3 महिन्यांपासून आपल्या तीन मुलांसह माहेरी राहत होत्या.

दरम्यान, या प्रकरणात अश्विनी यांच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. पती आणि सासरच्या मंडळींकडून मुलीला मानसिक तसेच शारीरिक त्रास दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या सततच्या त्रासामुळेच अश्विनी यांनी मुलांसह टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
घटनेतील अडीच वर्षांची वीरा ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रासह धाराशिव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.







