नवी मुंबई : कामोठे परिसरात एका 3 वर्षांच्या चिमुकलीसोबत स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर बसमध्ये चिमुकली एकटी राहिली होती. याच वेळी चालकाने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर पोलिसांनी 30 वर्षीय बसचालकाला ताब्यात घेत अटक केली. त्याला पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी इतर विद्यार्थ्यांसोबत दररोज खासगी स्कूल बसमधून शाळेत ये-जा करत होती. बुधवारी दुपारी सुमारे 12.30 वाजता चालकाने विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे त्यांच्या घराजवळ सोडण्यास सुरुवात केली. सर्व मुले उतरल्यावर बसमध्ये फक्त ही चिमुकली उरली होती. त्यावेळी नराधमाने चिमुकलीवर अत्याचार केला.

घरी गेल्यानंतर मुलीने पोटात दुखत असल्याचे आजीला सांगितले. त्यानंतर तिने बसमधील चालकाने आपल्याला त्रास दिल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी तातडीने शाळा प्रशासनाशी संपर्क साधत पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीच्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून शाळा प्रशासनाशी संबंधित कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे.







