पुणे : पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या वादातून चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांच्याबाबत एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या नावाने अनेक बनावट खाती उघडण्यात आली असून, त्याद्वारे वेगवेगळे संदेश पसरवले जात आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर विद्यानंद बापट यांनी स्वतः पुढे येऊन यावर स्पष्टीकरण दिले आहे.

बापट यांनी स्पष्ट केले की, ते सोशल मीडियावरील फेसबुक किंवा इन्स्टाग्राम यांपैकी कोणतेही व्यासपीठ वापरत नाहीत. “मी फक्त व्हॉट्सअॅप वापरतो, इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर माझे खाते नाही. सध्या एआय (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून माझ्या नावाने ही बनावट खाती तयार केली जात आहेत,” असे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवातील डीजेच्या आवाजाचा नागरिकांना होणारा त्रास आणि ध्वनीप्रदूषण या मुद्द्यांवरून बापट यांची भाषणे व वक्तव्ये नुकतीच प्रसिद्धीतीत आली होती. याच मुद्द्याचा फायदा घेत काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या नावाने डिजिटल खाती तयार करून दिशाभूल करणाऱ्या पोस्ट व्हायरल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर विद्यानंद बापट यांच्या नावाने दिसणाऱ्या कोणत्याही अकाऊंटवरून प्रसिद्ध झालेल्या माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
अशा फेक अकाऊंट्सवरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांना बळी पडू नका आणि कोणतीही अनधिकृत माहिती पुढे शेअर करू नका.
कोणत्याही चर्चेतील विषयावर सोशल मीडियावर चुकीचा प्रचार होणे धोकेदायक ठरू शकते. त्यामुळे अशा बनावट खात्यांपासून आणि त्यावरून होणाऱ्या प्रचारापासून सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.






