पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाकड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी पोलिसांनी एका खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या IT अभियंत्याला खबरदारी म्हणून ताब्यात घेतले आहे. स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या तरुणावर झालेल्या या कारवाईमुळे हिंजवडीतील IT कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

हिंजवडी आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते, मोठमोठे खड्डे आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांबाबत संबंधित अभियंता सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांमधून प्रश्न उपस्थित करत होता. नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने पोलिसांनी खबरदारीचा भाग म्हणून त्याला ताब्यात घेतले. या कारवाईनंतर अभियंत्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली. नागरिकांचे प्रश्न मांडणे हा गुन्हा नसल्याचे त्याने म्हटले आहे.

‘आम्ही देशद्रोही नाही. आमच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आवाज उठवत आहोत. आम्हाला ताब्यात घेण्याऐवजी अधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा करावी आणि IT पार्कमधील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा,’ अशी भूमिका त्याने मांडली. परदेशात नोकरी करण्यापेक्षा देशातच चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी इच्छा असल्याचेही त्याने सांगितले.







