पिंपरी-चिंचवड, ता. 05 : आळंदी, मरकळ, भानोबाची कोयाळी आणि वडगाव घेनंद परिसरातील विद्युत डीपीमधील तांब्या व अॅल्युमिनियमच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा, युनिट-३ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करून तब्बल 5 लाख 10 हजार रुपये किमतीच्या चोरीच्या तारा तसेच गुन्ह्यात वापरलेली तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, आरोपींकडून आळंदी आणि दक्षिण चाकण पोलिस ठाण्यांतील सात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, या सर्व गुन्ह्यांमधील 100 टक्के चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार विद्युत डीपी चोरीच्या घटनांचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे आणि त्यांच्या पथकाकडून सुरू होता.

दरम्यान, 3 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस अंमलदार बाळासाहेब खेडकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत डीपीमधील तारा चोरणारे आरोपी भानोबाची कोयाळी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अक्षय बाबासाहेब काळे (वय-34) आणि राहुल दिनकर पोकळे (वय-20) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, दोघांनी ललित मगर ऊर्फ नेपाळ्या याच्यासोबत विद्युत डीपीमधून तांब्या आणि अॅल्युमिनियमच्या तारा चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरी केलेला माल भंगार विक्रेत्यांना विकल्याची माहितीही चौकशीत समोर आली.

यानंतर पोलिसांनी ईजहार इस्माइल चौधरी (वय -40) आणि ब्रिजमोहन असर्फीलाल प्रजापती (वय-30) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून आळंदी, मरकळ, भानोबाची कोयाळी आणि वडगाव घेनंद परिसरातील विद्युत डीपीमधून चोरी केलेल्या 5 लाख 10 हजार रुपये किमतीच्या तांब्या-अॅल्युमिनियमच्या तारा पंचांसमक्ष जप्त करण्यात आल्या. याशिवाय चोरीच्या गुन्ह्यांसाठी वापरण्यात आलेली दोन दुचाकी आणि एक चारचाकी अशी तीन वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.
आरोपींच्या चौकशीत आळंदी आणि दक्षिण चाकण पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण सात विद्युत डीपी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.या सर्व गुन्ह्यांमधील चोरीचा 100 टक्के माल जप्त करण्यात आल्याने विद्युत डीपी चोरी करणाऱ्या टोळीला मोठा दणका बसला आहे. या कारवाईमुळे ग्रामीण भागातील विद्युत डीपी फोडून तांब्या-अॅल्युमिनियमच्या तारा चोरणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई झाली असून, अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोन्हाडे, ऋषीकेश भोसुरे, युवराज बिराजदार, सागर सूर्यवंशी, सचिन गोनटे, बाळासाहेब खेडकर, स्वप्निल महाले, अजित रुपनवर, निखील फपाळे, नितीन गुंजाळ, शशिकांत नांगरे आणि बाळासाहेब भांगले यांनी केली.







