पुणे: दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. उत्सवाच्या काळात मोठ्या आवाजात डीजे आणि ध्वनिक्षेपक वाजवणाऱ्या मंडळांवर यंदा कठोर कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे.

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. शहरातील विविध भागांमध्ये आवाजाची पातळी तपासण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात केली जाणार आहेत. या पथकांकडून डेसिबल मीटरच्या माध्यमातून ध्वनीची तीव्रता मोजली जाईल. नियमापेक्षा जास्त आवाज आढळल्यास संबंधित मंडळासह डीजे चालक आणि मालकावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच नियमबाह्य पद्धतीने वापरली जाणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा जप्त करण्याची कारवाईही केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ध्वनिक्षेपक यंत्रणेमध्ये ‘प्रेशर मिड’ आणि ‘प्लाझ्मा साउंड’सारख्या उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. उत्सवाच्या काळात केवळ ‘चार बास, चार टॉप’ वापरण्याची परवानगी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दहीहंडी उत्सवादरम्यान अनुचित घटना घडू नयेत यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता तसेच गणेश पेठ आणि कसबा पेठ परिसरातील काही मार्गांवर वाहतूक नियमन केले जाणार आहे.
दरवर्षी उत्सवांच्या काळात डीजे आणि लायटिंगवर मोठा खर्च केला जातो. मात्र नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. त्यामुळे यंदा पोलिसांची कारवाई प्रत्यक्षात किती कठोर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






