मुंबई : मुंबईतील खार पश्चिम भागात 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी एका भरधाव मोटारीने मागून धडक दिल्याने भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.सी.डी. रोड आणि 16 व्या रस्त्याच्या जंक्शनवर घडलेल्या या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,वांद्र्याच्या दिशेने मोटरसायकलने जात असलेले इयाप्पन सेल्वराज हरीजन (वय 41) आणि त्यांची पत्नी नॅन्सी (वय 37) या अपघाताचे बळी ठरले. इयाप्पन यांनी हेल्मेट घातलेले असतानाही मागून सुसाट आलेल्या पांढऱ्या रंगाच्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की नॅन्सी रस्त्यावर फेकल्या गेल्या, तर इयाप्पन थेट गाडीखाली अडकले.

हे दृश्य पाहताच स्थानिक लोकांनी तातडीने धाव घेऊन गाडी उचलली आणि इयाप्पन यांना बाहेर काढले. त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने कानातून मोठा रक्तस्राव होत होता. पती-पत्नी दोघांनाही तात्काळ भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी इयाप्पन यांना मृत घोषित केले. या अपघातात नॅन्सी यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

याच अनियंत्रित मोटारीने आणखी एका स्कूटीस्वारालाही उडवले, ज्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. अपघातानंतर खार पोलिसांनी 71 वर्षीय चालक सुधीर सिताराम सावंत यांच्याविरोधात BNS मधील कलम 106(1), 125(a), 125(b), 324(4), 281 आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. खार पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






