पुणे : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या मुलाखतीतील वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीच्या मुद्द्यावरून विरोधक भारतीय जनता पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करत असतानाच, रेड्डी यांनी देव आणि प्रांतीय ओळखींवर आधारित थेट भाष्य केले.रेड्डी यांच्या मते, प्रभू श्रीराम हे श्रीमंतांचे देव आहेत तर महादेव हे गरिबांचे दैवत आहेत. या कारणास्तव भाजप ‘हर हर महादेव’ असा जयघोष करत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

. पुढे बोलताना त्यांनी उत्तर आणि दक्षिण भारतातील सांस्कृतिक फरकाचा संदर्भ देत उत्तर भारतातील लोक आर्य तर दक्षिण भारतातील लोक द्रविड असल्याचा दावा केला आहे . भाजपवर निशाणा साधताना त्यांनी, उत्तर भारतातील राजकीय यशासाठी भाजपने प्रभू श्रीरामांना राजकीयदृष्ट्या आपलेसे केले आहे, असा आरोपही केला.या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेस आणि रेवंत रेड्डींवर तीव्र शब्दांत पलटवार केला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते शाहनवाज हुसैन यांनी, काँग्रेस लोकांमध्ये जातीय आणि सांस्कृतिक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे . तर केंद्रीय मंत्री बांदी संजय कुमार यांनी, तेलंगणाचे मुख्यमंत्री प्रभू श्रीराम आणि महादेव यांच्यात धार्मिक व राजकीय फूट पाडण्याचे काम करत असल्याचा थेट ठपका ठेवला आहे .देशभरात निवडणूक आयोग आणि विविध राजकीय मुद्द्यांवरून सरकारविरोधात वातावरण तापलेले असतानाच या विधानाने राजकीय वातावरण अधिकच पेटले आहे.

आतापर्यंत महापुरुषांना जाती-पातींच्या चौकटीत बांधून राजकारण केले जात होते; मात्र आता देवांमधेही गरीब-श्रीमंत असा भेद करून नव्या मुद्द्यावरून राजकीय चिखलफेक सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.






