जालना : गेल्या आठ दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे उपोषणकर्ते ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरु आहे.
या उपोषणाची दखल घेत विजय वडेट्टीवार हे उपोषणस्थळी दाखल झाले. लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेलेले विजय वडेट्टीवार यावेळी भावुक झाल्याचे दिसून आले. त्यांची खालावलेली प्रकृती पाहून वड्डेटीवारांना अश्रू अनावर झाले. भावूक झालेल्या वडेट्टीवारांनी स्वत:ला सावरत उपोषणस्थळाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपोषणस्थळी सरकारचं शिष्टमंडळ पाठवण्याची विनंती केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण उद्या मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ पाठवू, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांना दिलं. लक्ष्मण हाके यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, याची आपण काळजी घेतली आहे असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
उपोषणस्थळावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, “ओबीसींच्या मागे उभे राहणे हे माझं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. सत्ता येते आणि जाते, पदाचा मी कधीच विचार केला नाही. हे छत्रपती शिवरायांचे, शाहू-फुले-आंबेडकरांचे राज्य आहे. या पुरोगामीत्वाला धक्का लावण्याचे काम 2014 ला सुरू झालं. सरकारचे शिष्टमंडळ उद्या येणार आहे. लक्ष्मण हाकेंना पूर्ण अभ्यास आहे. सगेसोयऱ्यांचा विषय न्यायालयात टिकणार नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय, मग त्यांचा अध्यादेश कशाला काढताय. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दोन समाज एकमेकांविरोधात उभे राहिले असून सामाजिक सलोखा उद्ध्वस्त होत आहे.” असे स्पष्ट मत विजय वडेट्टीवार यांनी मांडले.