पुणे : इंस्टाग्राम रिलचा तरूणाईला एवढा मोह पडलाय की रिल बनवण्याच्या नादात अनेकजण आपल्या जिवाचीही पर्वा करत नाहीत. खरंतर क्रिएटिव्हिटीला वाव देणाऱ्या या रिल कलेला आता विकृत रूप येऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. पुण्यातील तरूण-तरूणींच्या स्टंटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नऱ्हे परिसारातील स्वामीनारायण मंदिराजवळचा हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे.
लाईक, शेअर आणि कमेंटसाठी रिल बनवण्याच्या नादात स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळील एका रिकाम्या इमारतीवर शूट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी छताला लटकत असून तिने एका मुलाचा हात पकडला आहे. व्हिडिओमध्ये मुलगी कॅमेऱ्यासमोर जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे. या जोडप्याच्या जवळच्या दोन मित्रांनी रील शूट केली. या स्टंटमध्ये मुलीच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
या व्हिडिओमध्ये मुलगा छतावरून खाली वाकून उभा होता आणि त्याचा मित्र हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करत होते. तर मुलगी मुलाच्या हाताला पकडून लटकलेली दिसत आहे. मुलगी इमारतीच्या पलीकच्या बाजूला उतरत स्वत:ला हवेत फेकताना दिसत आहे. स्टंट करताना मुलगी निर्भयपणे किंवा मूर्खपणे हसताना दिसते. हात सुटला असता, तर ती खोल कोसळली असती. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. सोशल मीडियासाठी रीलचे शूटिंग सुरू होते. मात्र, त्याच्या धोकादायक स्टंटला आवश्यक सुरक्षा व्यवस्था नव्हती.
View this post on Instagram
सोशल मीडियावर लवकर प्रसिद्धी मिळवण्यासाठी रिल्स केली जात आहेत. मात्र यामुळे मुलांच्या पालकांची चांगलीच झोप उडाली आहे. सोशल मीडियामुळे प्रत्येकाच्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळू शकतो. याच सोशल मीडियाने रिल्सची निर्मिती केली आहे. अवघ्या मिनिटांत व्यक्तीला क्रिएटिव्हिटी दाखवण्याची संधी मिळाली. परंतु, याद्वारे काही तरी उत्तम सादर करण्याऐवजी स्टंटबाजी करून स्वतःचे आणि दुसऱ्यांचे प्राण धोक्यात घालणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही मिनिटांच्या रिलसाठी जीव धोक्यात घालणारे हे विसरतात की, थोडीसी जरी चूक झाली, तर ते आपल्या जीवावर बेतू शकते. तरीही अशा परिस्थितीत व्हिडीओ अथवा रिल्स बनवण्याचा मोह अनेक जणांना आवरता येत नाही.