Latur Railway Coach Factory : लातूर : मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याला सुरुवात करण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येऊन अनेक महिने झाले आहेत. मात्र अद्याप लोकार्पणाचा काहीच पत्ता नाहीये. पहिल्या टप्प्यात या ठिकाणी 1,920 रेल्वे बोगी तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. पण, कामाला कधी सुरूवात होणारा? असा प्रश्न विचारला जात आहे. विशेष म्हणजे लातूरमधील या रेल्वे कोच कारखान्यामुळे हजारो कामगारांच्या हाताला काम मिळण्याची शक्यता आहे.
120 वंदे भारत रेल्वे गाड्या तयार होणार
200 पैकी 120 वंदे भारत रेल्वे गाड्या या लातूरच्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात तयार होतील असेही सांगण्यात आले होते. तसेच, उर्वरित 80 रेल्वेगाड्या या चेन्नई येथे तयार केल्या जाणार होत्या. यासाठीची 58 हजार कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. दहा महिन्यापूर्वी देण्यात आलेल्या माहितीनुसार रेल विकास निगम लिमिटेड आणि रशियाच्या सीजेएससी ट्रान्समास कॅसोर्टियम या दोन कंपन्यांच्या बोली मान्य झाल्या होत्या. या दोन कंपन्यांसोबत करार करण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती.
कारखान्याची स्थिती
लातूर शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर लातूर कोच फॅक्टरी आहे. यासाठी एकूण 350 एकर क्षेत्र घेण्यात आले असून, यापैकी 120 एकरवरील बांधकाम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. पहिला फेजमध्ये एका महिन्यात 16 कोच निर्मिती शक्य आहे. तर, दुसऱ्या फेजमध्ये वर्षाला 400 कोच आणि तिसऱ्या फेज म्हणजे वर्षाला 700 कोच निर्मिती करणाऱ्या अवाढव्य कारखान्याचे पहिल्या टप्प्यात 100 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कामाला उशीर होत असल्याचे बोलले जात आहे.
लातूरमधील प्लॅन्ट असा असणार
वंदे भारत रेल्वेच्या सर्व बोगी स्टीलमध्ये बनवण्यात येणार आहेत. वंदे भारत हे सेमी हाय स्पीड ट्रेन असून, ज्यामध्ये 16 सेल्फ प्रोपेल्लेड कोच आहेत. या कोचसाठी वेगळ्या इंजिनची आवश्यकता असणार नाही. या रेल्वेगाड्या वातानुकूलित असून, जिवाणू विरोधी प्रणाली यामध्ये असणार आहे. 140 सेकंदात 160 किमी ताशी वेग देण्याची क्षमता असलेल्या गाड्या लातूरमध्ये तयार होतील. केंद्र सरकारने 2021 आणि 2022 चा अर्थसंकल्पात 2025 अखेर भारतात 400 वंदे भारत रेल्वे गाड्या तयार करण्याचे लक्ष ठेवले आहे. यातल्या काही गाड्या लातूरमध्ये तयार होवून परदेशात सुद्धा पाठवण्याचा विचार आहे.
स्थानिकांना रोजगार मिळणार
लातूरमधील रेल्वे कोच कारखान्यात 200 पैकी 120 वंदे भारत रेल्वे गाड्या तयार केल्या जाणार आहेत. त्यामुळे लातूरसह मराठवाड्यातील बेरोजगार तरुणाच्या हाताला काम मिळण्याची शक्यता आहे. यासाठी 70-30 असा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यामुळे, 70 टक्के जागेवर स्थानिक लोकांना रोजगार मिळणार असून, असा शब्द येथील कारखान्याच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी देण्यात आला होता.