बीड : बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेईना. रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रूपयांची लाच घेताना केजमधील कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तसेच केजचा तहसीलदार देखील यामध्ये आरोपी असून तो फरार झाला आहे. मच्छिंद्र माने हा कोतवाल असून तहसिलदार अभिजीत पाटील याच्यासाठी वसूलीचे काम करतो. बीडमध्ये लाचखोरांच्या विरोधामध्ये लाचलुचपत विभागाकडून मोहीम राबवण्यात येत असून यामध्ये त्यांना मोठं यश आलं आहे. .
धाराशिव येथील पथकाने शुक्रवारी रात्री 10 वाजता ही कारवाई केली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे सत्र सुरूच असून एसीबीकडूनही कारवायांचा धडाका चालूच आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातीलच एका रेशन दुकानदारावर कारवाई प्रस्तावित होती. ती न करण्यासाठी तहसीलदार अभिजीत पाटील याने 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. हीच लाच कोतवाल माने याने स्विकारली आणि यावेळी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. मात्र, तहसीलदार अभिजीत पाटील हा फरार झाला आहे. धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आठवड्यातील दुसरी कारवाई बीड जिल्ह्यात केली आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील माजलगावच्या पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर याला 28 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. शुक्रवारी सलगरकरच्या सांगलीमधील युनियन बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये सोन्याचे बिस्किट, दागिने आणि रोख रक्कम असे एकूण 1 कोटी 61 लाख रुपयांचे ऐवज पोलिसांना आढळून आला आहे.