छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडले, यावरून वाद सुरु असतानाच आता एक नवा वाद समोर आला आहे. सध्या राज्यात मराठा आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत. त्यामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, परिणामी सध्या धरणात पाणी सोडू नका, अशा आशयाचे पत्र मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना लिहिले आहे. त्यांच्या या पत्रातुळे मराठा समाज आक्रमक झाला असून, हा मराठा आंदोलनाचा बदनाम करण्याचा घाट असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
मराठवाड्यात मराठा आरक्षणाची सर्वाधिक दाहकता असल्याने, पाणीबाणी करण्याचा हा कुटील डाव शासकीय पातळीवरूनच रचला जात आहे का? अशी चर्चा रंगली आहे. या पत्रावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटाने कडाडून विरोध केल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.
अशोक चव्हाण यांचे ट्विट चर्चेत
चव्हाण यांनी ट्विटद्वारे सूचित केले की, मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यामध्ये सुरु आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडीत पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला पत्र लिहिल्याची बातमी धक्कादायक आहे. हा मराठा आरक्षण आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव आहे. पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न आहे.
सदरहू पत्र कोणत्या कारणांमुळे लिहिले गेले, याचा राज्य सरकारने तातडीने खुलासा करावा. उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडीत ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या ३० ऑक्टोबर २०२३ रोजीच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही.
त्यामुळे मराठवाड्यातील तीव्र पाणी टंचाई व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता राज्य सरकारने राजकीय दबावाला बळी न पडता मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडावे, अशी आग्रही मागणी मी पुन्हा करत आहे. उर्ध्व भागातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा काय संबंध आहे? उगाच मराठा आंदोलनाला बदनाम करू नका अन् पाणी सोडण्याचे टाळू नका, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हा तर मराठा आरक्षणाला बदनाम करायचा डाव…
मराठा आरक्षण आंदोलन सुरू असल्यामुळे जायकवाडीत वरच्या धरणातून पाणी सोडता येणार नाही, असे पत्र देऊन सरकारला मराठा आरक्षण आंदोलन बदनाम करायचे आहे, असा सणसणीत आरोप ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी लगावला आहे. मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना दिलासा देण्याऐवजी जखमेवर मीठ चोळण्याचा काम सरकार करत असल्यामुळे तत्काळ पाणी सोडले नाही, तर आम्ही येणारे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा राहुल पाटील यांनी सरकारला दिला.