Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती . त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. काही वेळातच पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
तर दुसरीकडे जायकवाडीला पाणी देण्यास नगर आणि नाशिक जिल्ह्यातील नेत्यांसह नागरिकांनी विरोध केला असून आता जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी राज्यातील अनेक भागात अपेक्षित तेवढा पाऊस झालेला नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक गावात पिण्याच्या पायासाठी नागरिकांना वणवण फिरावं लागत आहे.
अशातच जायकवाडी धरणाला नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याची मागणी होत असून या मागणीला नगर-नाशिकमधील सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे. धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे आता जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे. या आंदोलनामध्ये माजी मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांचाही सहभाग होता.