बीड : लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाचा आजचा नववा दिवस असून हाके आणि त्यांच्या सहकाऱ्याची प्रकृती खालावली आहे. आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतरही यावर तोडगा निघाला नसल्याने ओबीसी बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात ओबीसी बांधवही रस्त्यावर उतरले आहेत. लातूर – सोलापूर महामार्गावरील औसा मोड येथे ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको केला आहे. ‘ज्यांना आरक्षण पाहिजे, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, पण ओबीसीतून आरक्षण घेऊ नका,’ अशी मागणी करत आंदोलकांनी एक तास महामार्ग अडवून ठेवला.
तसेच बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला येथील ओबीसी महिलांसह आंदोलकांनी बीड- अहमदनगर- कल्याण महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको केला. या रस्ता रोको केलेल्या ओबीसी आंदोलकांनी थेट ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी फोन केला. आम्हाला जिव देण्याची वेळ आली तर देऊ, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभा राहू, असे आश्वासन यावेळी आंदोलकांनी दिले आहे.