बीड : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज पेटून उठला. आरक्षणासाठी आंदोलन सुरु असतानाच ३० व ३१ ऑक्टोबर रोजी बीडमधील आंदोलक आक्रमक झाले होते. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या राहत्या घरात आणि राष्ट्रवादी भवनात देखील आग लावण्यात आली होती. यावर क्षीरसागर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बीडमध्ये जाळपोळ केली त्यांना अद्याप अटक का झाली नाही? दुपारी दोन वाजल्यापासून बीड जळत असताना पोलीस तब्बल सात तास हातावर हात ठेवून शांत बसले होते का? यादरम्यान, पोलिसांनी साधे सायरन सुद्धा वाजवले नाहीत. याचे उत्तर सरकारने द्यावे, असा हल्लाबोर क्षीरसागर यांनी केला आहे.
दरम्यान, ३० व ३१ ऑक्टोबर रोजी बीडमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत. यावरून संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा बीड पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. क्षीरसागर म्हणाले की, आंदोलन करणारे वेगळे आणि तोडफोड, जाळपोळ करणारे वेगळे होते. जातीजातीत भांडणे लावण्यासाठी हे षडयंत्र होते.
त्यामुळे, मी शांत होतो. मात्र, या घटनेनंतर बीड शहरातील व्यापारी अद्याप घाबरलेले आहेत. आम्ही या परिस्थितीत शहरात राहू शकत नाही, असे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
बीडमध्ये घडलेल्या घटनेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहे. याआधारे समाजकंटकांचा सूत्रधार पोलिसांनी शोधून काढावा, व मुख्य सूत्रधारावर कारवाई करावी. आगामी अधिवेशनामध्ये देखील या जाळपोळीविरूद्ध आवाज उठवणार असल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी भवनात घुसून जमावाने तोडफोड केली. तसेच, इमारतीला आग लावली. यामुळे इमारतीमधील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे, यंदाच्या दिवाळीत पाडवा सण याच राष्ट्रवादी भवनमध्ये कुटुंबासह साजरा करण्याची घोषणा रोहित पवार आणि आमदार क्षीरसागर यांनी केली होती. त्यानुसार, जळालेल्या या कार्यालयात यंदाची दिवाळी पवार आणि क्षीरसागर कुटुंबांनी साजरी केली आहे.