छत्रपती संभाजीनगर : इम्तियाज जलील यांनी इशारा देताच वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाच्या पत्रिकेवर त्यांचे नाव टाकण्यात आले आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाच्या पत्रिकेत इम्तियाज जलील यांचे नाव नव्हते. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील चांगलेच संतापले होते. त्यावर त्यांनी त्यांना माझी काही अॅलर्जी आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. तसेच, उद्घाटनापूर्वी दणका दाखवतो असा इशाराही जलील यांनी दिला होता.
दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या इशाऱ्यानंतर उद्घाटनाच्या पत्रिकेत रेल्वे विभागाने इम्तियाज यांचे नाव टाकले आहे. यासाठी रात्री उशिरा पुन्हा एकदा दुसरी पत्रिका तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचे देखील नाव नव्हते, मात्र आता त्यांचे नाव देखील पत्रिकेत टाकण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सातवी आणि मराठवाड्याला मुंबईला जोडणारी पाचवी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस शनिवारपासून जालना-मुंबई मार्गावर धावणार आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाच्या पत्रिकेत नाव नसल्याने खासदार इम्तियाज जलील आक्रमक झाले होते. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकामध्ये येऊन एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमात जलील यांचं नाव नसल्यानं हे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर रेल्वे विभागाने जलील यांचे नाव असलेली नवीन पत्रिका तयार केली.
जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक
30 डिसेंबर 2023 ला 8 डब्ब्यांची वंदे भारत ट्रेन जालन्याहून सकाळी 11 वाजता रवाना होईल.
जालन्याहून रवाना झालेली ही गाडी सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी औरंगाबादला पोहोचेल.
11 वाजून 57 मिनिटांनी प्रस्थान करेल.
त्यानंतर ट्रेन मनमाड जंक्शनवर 13:42 तास/13:44 तास
नाशिकरोड – 14:44 तास/14:46 तास
कल्याण जंक्शन – 17:06 तास/17:08 तास
ठाणे – 17:28 तास/17 :30 तास
दादर – 17:50 तास/17:52 तास
सीएसएमटी मुंबई – 18:45 तास पोहोचेल पोहोचेल.