छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार कोण हरणार? याचे आडाखे बांधले जातात. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये पैज सुद्धा लावली जाते, कोणता नेता जिंकणार आणि कोणता नेता हरणार? अशाच प्रकारची पैज विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार यांच्या विजयावर दोघांकडून लावण्यात आली आहे. ही पैज पाचशे, हजार किंवा काही रोख रकमेची नसून थेट बुलेटची आहे. यासाठी बॉण्ड पेपर देखील तयार करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार उभे आहेत. अब्दुल सत्तार हे सलग चौथ्यांदा या विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीत उभे आहेत. यापूर्वी सलग तीन वेळा त्यांनी सिल्लोड मतदारसंघातून एक हाती विजय मिळवला आहे. यावर्षीही ते विजयी होतील अशी त्यांच्या समर्थकांना खात्री आहे. मात्र त्या विजयाचं मताधिक्य किती असेल यावरून चर्चा रंगू लागली आहे. त्यावरूनच ही पैज लावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
यंदाच्या निवडणुकीमध्ये सत्तार यांचा विजय किती मतांनी होणार? यावरून यांच्या समर्थकांमध्ये पैज लागली आहे. जो पैज जिंकेल त्याला बुलेट मिळणार आहे. ही पैज ५०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर लिहून लावण्यात आली आहे. नदीम शेख आणि अब्दुल कुरेशी या दोन कार्यकर्त्यानी ही पैज लावली आहे. शेख नदीम यांनी अब्दुल सत्तार हे ३० ते ४० हजारांच्या मतांनी निवडून येतील, असा दावा करण्यात आला आहे. तर अब्दुल कुरेशी यांनी १० ते २० हजार मतांनी विजयी होतील, असा दावा केला आहे. त्यावरून ही बुलेट पैज लागली आहे.
सत्तार यांच्या समर्थकांकडून विजयाच्या मताधिक्यावर जरी चर्चा सुरू असली तरी यावेळेस अब्दुल सत्तारांसाठी ही निवडणूक कठीण जाणार असल्याची चर्चा मतदारसंघांमध्ये सुरू आहे. भाजपमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटात गेलेले सुरेश बनकर हे त्यांचे विरोधी उमेदवार आहेत. त्यातच स्थानिक भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे युतीचे उमेदवार असूनही अब्दुल सत्तार यांना युतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधाचा सामना प्रचाराच्या काळात करावा लागत आहे.