नांदेड : टोल नाका चालवायचा असेल तर पन्नास हजार रुपये द्या नाहीतर…! अशी धमकी देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या (Nanded News) एका माजी तालुकाध्यक्षाने आपल्या साथीदारांसह टोल नाक्याची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील टोल नाक्यावर घडली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष शशी पाटील आणि त्यांचे तीन अनोळखी साथीदार टोल नाक्यावर आले. यावेळी शशी पाटील याने येथे काम करणाऱ्या गोविंद इंगोले या कर्मचाऱ्याचा शर्ट पकडून त्याला काम करण्यापासून थांबवले आणि शिवीगाळ करत तुझा मॅनेजर यादव कुठे आहे? “पन्नास हजार रुपये हप्ता दे..! एक महिन्यापासून सांगितले होते, पण अजून पैसे जमा केले नाहीत. आता तो टोलवर कसा येतो बघतोच त्याला तर आता खतम करतो,” अशी धमकी दिली आहे. या धमकीनंतर शशी पाटीलने टोल नाक्यावर दहशत माजवत तेथील ऑटोमॅटिक गेट सिस्टीमची तोडफोड केली. यावेळी अंदाजे 55 हजार रुपयांचे नुकसान झाले. नंतर दगड मारून केबिन, कॉम्प्युटर आणि टी.एल.सी. मशीनचे अंदाजे 60 हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्याचाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दिड महिन्यापूर्वीही शशी पाटील याने टोल नाक्याच्या कर्मचाऱ्याला “मी शशी पाटील आहे, मी तालुकाध्यक्ष आहे. तुम्हाला जर इथे टोल चालवायचा असेल तर मला 50 हजार रुपये द्या, नाहीतर मी तुमचा टोल तोडून मोर्चा आणून हे काम बंद करेन,” अशी धमकी देत खंडणी मागितली होती.
दरम्यान, याप्रकरणी अनिल प्रेमलाल यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून शशी पाटीलसह अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि खंडणी मागणे यासह विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







