विशाल शिंदे

भोर: भोर तालुक्यातील विसगाव खोरे व खानापूर परिसरातील शेतकरी सध्या एका नव्या संकटाला सामोरे जात आहेत. अतिवृष्टी, हवामान बदल व पिकांची रखडलेली पेरणी या सर्व संकटांना तोंड देऊन खरीपातील कडधान्य व भात पिक जोमात येऊ लागले असतानाच आता या भागात गोगलगायींच्या प्रचंड उपद्रवाने शेतकरी हैराण झाला आहे. (Snail infestation in Khanapur area of Visgaon valley)

सलग चार महिन्यांच्या पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. खरिपातील सोयाबीन, भुईमूग, घेवडा, झेंडू, भात यांसारख्या पिकांवर आता रात्रीच्या वेळी भल्यामोठ्या गोगलगायी हल्ला करत असून, या गोगलगायी पिकांची पाने, खोडे व कळ्या कुरतडत आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
खानापूर येथील शेतकरी जयवंत कोंढाळकर यांनी सांगितले की, “आम्ही अनेक वेळा औषध फवारणी करून पाहिली, पण गोगलगायी औषध लागल्यानंतर कवचात जाऊन बसतात. त्यामुळे औषधांचा काही परिणाम होत नाही. एक गोगलगाय एकावेळी अनेक पिलांना जन्म देते, त्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रात्रीच्या वेळी या गोगलगायींनी संपूर्ण शेत साफ केल्यासारखे चित्र दिसते.”
यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकाची कापणी करताना सुद्धा गोगलगायींचे अस्तित्व राहते. काही शेतकऱ्यांनी सांगितले की, “भात भरडताना या गोगलगायींमुळे तांदळात खडे आढळतात,” अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
या सर्व परिस्थितीकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. “कृषी अधिकारी आणि कर्मचारी शेतात पाहणीसाठी फिरकतही नाहीत,” असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी गोगलगायींचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी कृषी विभागाने तात्काळ विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, या संपूर्ण परिस्थितीचा आढावा प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी घेतला असून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली आहे.
भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या गोगलगायींच्या उपद्रवाने नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शासन आणि कृषी विभागाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना केल्यासच शेतकऱ्यांचा दिलासा मिळू शकतो.







