पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार केल्यानंतर कारवाई होण्याच्या भीतीने कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) परदेशात पळून गेल्याची माहिती आहे. मात्र, घायवळच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, पोलिसांनी आता त्याची कुंडलीच बाहेर काढायला सुरुवात केली आहे.

पुणे पोलिसांनी निलेश घायवळ याच्या घरी दोन दिवसांपासून छापेमारी सुरू केली असून, या छापेमारीमध्ये पोलिसांना मोठं घबाड सापडलं आहे. इतकंच नाहीतर घायवळ याचे कोथरूड परिसरातील ऑफिसही सील करण्यात आले आहे.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत घायवळ याच्या घरातून कागदपत्रे, आधार कार्ड, बँक पासबुक, 10 डेबिट कार्ड, 5 क्रेडिट कार्ड यासह अनेक जमिनीचे कागदपत्र जप्त केले आहेत. यासह घायवळच्या घरातून 10 तोळे सोने काही चांदी आणि मोठ्या प्रमाणात रक्कम देखील जप्त केली आहे. यापूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाई घायवळकडे असलेल्या दोन स्कॉर्पिओ (Scorpio) कार आणि दोन दुचाकी देखील जप्त केल्या आहेत.
दरम्यान, पोलीस निलेश घायवळ याच्या मुसक्या आवळण्यासाठी त्याच्या सगळ्या पत्त्यांवर छापेमारी करत असून, लवकरच घायवळचा पासपोर्ट रद्द करून त्याला भारतात आणले जाणार असल्याचं बोललं जात आहे.







