मुंबई: महाराष्ट्र सरकारने राज्यातील 14 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे. त्यांची नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विश्वास नांगरे पाटील हे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. आता त्यांच्याकडे नागपूर शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागपूरमध्ये गेल्या काही महिन्यांत कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न चर्चेत आले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांची बदली करून त्यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे.

या बदल्यांमध्ये पुणे शहरालाही नवा अधिकारी मिळाला आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक अभिनाज कुमार यांची पुणे शहराचे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच हिंगोलीचे पोलीस अधीक्षक निलेश रोहेन यांची नांदेड येथे बदली करण्यात आली आहे.
याशिवाय राज्यातील विविध पोलीस आयुक्तालये, पोलीस अधीक्षक कार्यालये, सायबर विभाग, राज्य राखीव पोलीस बल आणि गुन्हे अन्वेषण विभागातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर राज्यभरात या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. कठोर आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या नांगरे पाटील यांच्याकडून नागपूरमधील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारच्या या मोठ्या प्रशासकीय फेरबदलामुळे अनेक महत्त्वाच्या पोलीस विभागांमध्ये नव्या नेतृत्वाची सुरुवात होणार आहे.







