पुणे : गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील गणेशमूर्तींचे आगमन तसेच विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात, यासाठी महामार्ग प्रशासनाने जड आणि अवजड मालवाहू वाहनांसाठी वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जड वाहनांना ठराविक दिवशी प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता असते. त्यातच गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतुकीवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

१५, १८, १९ आणि २० सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक पूर्ण होईपर्यंत या मार्गांवरून ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड व अवजड वाहनांना प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी या निर्बंधांचा विचार करून आपल्या प्रवासाचे पूर्वनियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशीही जड वाहनांसाठी विशेष निर्बंध असतील. २५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत जड व अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू राहणार आहे.
प्रवेशबंदीच्या काळात मालवाहू वाहने महामार्गावर किंवा रस्त्याच्या कडेला उभी न करता सुरक्षित ट्रक टर्मिनल्स, लॉजिस्टिक पार्क किंवा प्रशासनाने नियुक्त केलेल्या पार्किंगच्या ठिकाणी उभी करावीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहनचालक आणि ट्रान्सपोर्टर्स यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच प्रवासापूर्वी वाहतूक निर्बंधांची माहिती घेऊन नियोजन करावे, असे आवाहन महामार्ग सुरक्षा पथकाकडून करण्यात आले आहे.







