पिंपरी-चिंचवड: रस्त्याने जाताना एखाद्याला मार्ग विचारणे आणि त्याबाबत माहिती घेणे ही सामान्य बाब आहे. मात्र, रस्त्याची माहिती दिल्यामुळे एका 55 वर्षीय व्यक्तीला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील कान्हूर करमाळा-दावडी रोडवर घडली आहे. चुकीची माहिती दिल्याचा संशय घेत दोन तरुणांनी संबंधित व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता झाडाच्या फांदीने त्यांच्या चेहऱ्यावर वार करण्यात आले. या हल्ल्यात त्यांचा अर्धा दात तुटला असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना गुरुवारी (15 ऑक्टोबर) सायंकाळी घडली. या प्रकरणी भाऊसाहेब विठ्ठल दौंडकर (वय 55, रा. दौंडकरवाडी, शेल पिंपळगाव, ता. खेड) यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब दौंडकर यांना दोन तरुणांनी रस्त्याबाबत विचारणा केली होती. त्यावर त्यांनी दोघांना मार्गाची माहिती दिली. मात्र, दौंडकर यांनी सांगितलेला रस्ता आणि अंतर चुकीचे असल्याचा संशय तरुणांना आला. याच कारणावरून दोघांनी त्यांच्याशी वाद घालत मारहाण सुरू केली.

मारहाणीबाबत जाब विचारल्यानंतर आरोपी आणखी आक्रमक झाले. त्यांनी झाडाच्या फांदीने दौंडकर यांच्या तोंडावर आणि दातांवर वार केले. या हल्ल्यात त्यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली आणि अर्धा दात तुटला. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दौंडकर यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वैभव दत्तात्रय दौंडकर (रा. कनेसरर, ता. खेड) आणि सुजित दिलीप अमराळे (रा. दावडी, ता. खेड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास उत्तर चाकण पोलीस करत आहेत.






