पुणे, ता. 17 : दुष्काळी परिस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून यंदा उन्हाळी आवर्तन न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणांमधील उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे उन्हाळी आवर्तनावर अवलंबून असलेल्या अडीच लाख हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असून, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमधील पाणी पुणे शहरासह पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर या तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी वापरले जाते. याशिवाय शेतीच्या सिंचनासाठीही कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे शंभर टक्के भरली होती. पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे मुठा नदीतून सुमारे 19टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्याच काळात कालव्याद्वारेही अतिरिक्त पाणी सोडण्यात आले. रब्बी हंगामातील आवर्तन सुरू होण्यापूर्वीच कालव्यातून सुमारे 6.38 टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर या तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्याचा खरिपातील पिकांना फायदा झाला. मात्र, आता उन्हाळी आवर्तन बंद करण्याचा निर्णय झाल्याने पुढील हंगामातील पिकांना पाणी कसे मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्यात पिकांना पाण्याची गरज अधिक असते. अशा काळात कालव्याचे आवर्तन बंद राहिल्यास सिंचनासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. विहिरी आणि बोअरवेलवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनाही भूजलपातळी कमी झाल्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याबरोबरच शेतीच्या पाण्याबाबत प्रशासनाकडून पुढील काळात कोणते पर्याय उपलब्ध करून दिले जाणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पिण्याच्या पाण्याची गरज भागविणे आवश्यक असले, तरी सिंचनासाठी पाणी उपलब्ध न झाल्यास त्याचा फटका शेती उत्पादनाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी आणि शेतीचे सिंचन यांचा समतोल साधण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.






