लोणी काळभोर, ता. 17 : चपळाई, अचूक नियोजन आणि सांघिक कौशल्याच्या जोरावर लोणी काळभोर (ता.हवेली) पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या 17 वर्षांखालील मुलांच्या खो-खो संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावत दिमाखदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात इंदापूर तालुक्याच्या संघाचा धुव्वा उडवत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या या संघाची आता विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे लोणी काळभोरच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026 रोजी दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील श्री सद्गुरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुलांच्या तीन संघांनी हवेली तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.

उपांत्य फेरीत शिरूरवर, तर अंतिम फेरीत इंदापूरवर मात!

17 वर्षांखालील मुलांच्या संघाने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. उपांत्य फेरीत शिरूर तालुक्याच्या संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात एक डाव व तीन गुणांनी विजय मिळवत संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यातही खेळातील सातत्य कायम राखत इंदापूर तालुक्याच्या संघाला एक डाव व चार गुणांनी पराभूत केले. या विजयासह संघाने जिल्हास्तरीय विजेतेपदावर आपले नाव कोरले आणि विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
आर्यन हालमे ठरला अष्टपैलू खेळाडू!
या स्पर्धेत आर्यन रामा हालमे याने आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याची स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल आयोजकांच्या वतीने त्याला सायकल बक्षीस देऊन गौरविण्यात आले. विजेत्या संघालाही ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, क्रीडा अधिकारी महेश चावले, मिलिंद कुरपे आणि काजल भोर उपस्थित होते.
मार्गदर्शकांच्या मेहनतीला यश
संघाच्या या यशामागे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुरेश कोरे, राजेश चौरे आणि सुनील टिळेकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. तसेच माजी खेळाडू अभिजीत खेडेकर, संदीप भुजबळ, राम वीरकर आणि प्रणव वीरकर यांचेही मोलाचे योगदान लाभले.
दरम्यान, या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य सिताराम गवळी, उपप्राचार्य विलास शिंदे, ज्युनिअर कॉलेजचे इन्चार्ज कचरे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि पालकांनी विजेत्या खेळाडूंचे तसेच मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. जिल्हास्तरावर विजयाचा झेंडा फडकावल्यानंतर आता विभागीय स्पर्धेतही दमदार कामगिरी करण्यासाठी संघ सज्ज झाला असून, या पुढील आव्हानाकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.







