छत्रपती संभाजीनगर : येथील वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका 24 वर्षीय महिलेने आपल्या पतीविरुद्ध गंभीर स्वरूपाची कायदेशीर तक्रार नोंदवली आहे. इन्स्टाग्रामवर झालेली ओळख आणि त्यानंतर जुळलेले प्रेमप्रकरण लग्नात बदलल्यानंतरही पतीच्या विकृत वागणुकीमुळे या विवाहित महिलेवर मोठे संकट ओढवले आहे. पतीने आपल्या पत्नीचे अतिशय खाजगी व्हिडिओ तिच्याच आई, वडील व बहिणीच्या मोबाईलवर पाठवून बदनामी केली, तसेच मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपीची सुमारे 7 ते 8 महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने पंढरपूर, वाळूज आणि वडगाव कोल्हाटी येथील एका भाड्याच्या खोलीत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा महिलेचा आरोप आहे. याच काळात आरोपीने त्यांचे काही खाजगी व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवले होते. यानंतर 10 ऑक्टोबर रोजी दोघांमध्ये वाद झाला आणि 11 ऑक्टोबर रोजी त्यांनी लाडगाव येथील एका विवाह संस्थेत हिंदू पद्धतीनुसार लग्न केले. मात्र, लग्नानंतरही दोघे वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते.

हा वाद इथेच थांबला नाही. 14 ऑक्टोबर रोजी आरोपी त्या महिलेच्या घरी पोहोचला आणि तिचे सिमकार्ड सोबत घेऊन गेला. महिलेने त्याच्यासोबत राहण्यास स्पष्ट नकार दिल्याने संतापलेल्या पतीने धमकीची अंमलबजावणी केली. त्याने त्या महिलेचे अत्यंत खाजगी व्हिडिओ आणि लग्नाचे छायाचित्र तिच्या आई, वडील तसेच बहिणीच्या व्हॉट्सॲपवर पाठवले. यामुळे नातेवाइकांमध्ये तिची मानहानी झाली. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी पीडितेने जाब विचारण्यासाठी वडगाव कोल्हाटी गाठले असता, आरोपीने तिला अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

या सर्व प्रकारामुळे हादरलेल्या महिलेने अखेर पोलिसांत धाव घेतली. सुरुवातीला वेदांतनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भातील तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु, घटनेचे ठिकाण वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने हा गुन्हा झिरो नंबरने नोंदवून पुढील तपासासाठी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.






