शिरूर : शिरूर शहरामधील गजबजलेल्या सुभाष चौक परिसरातील मळगंगा ज्वेलर्स या सराफ दुकानात दोन अनोळखी महिलांनी हातसफाई करत तब्बल 2 लाख 17 हजार 500 रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोन्याची चैन खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या या महिलांनी दुकानदार आणि कर्मचाऱ्यांची नजर चुकवून चोरी केल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान दोन अनोळखी महिला तोंडाला स्कार्फ बांधून सुभाष चौकातील मळगंगा ज्वेलर्समध्ये आल्या होत्या. सोन्याची चैन खरेदी करायची असल्याचे सांगून त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांकडून विविध चेन पाहण्यास सुरुवात केली.

दरम्यान, दुकानातील कर्मचारी त्या महिलांना सोन्याच्या चेन दाखविण्यात व्यस्त असताना या महिलांनी संधी साधली. दुकानदार आणि कर्मचाऱ्यांची नजर चुकवून सुमारे दीड तोळे वजनाची, 2 लाख 17 हजार 500 रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास केली. काही वेळानंतर चैन चोरीला गेल्याचे दुकानदार आणि कर्मचारी यांच्या लक्षात आले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी ज्वेलरी दुकानाचे मालक राजेंद्र अरुण लोळगे (वय 52, रा.मारुती आळी, डॉ.बोरा हॉस्पिटलसमोर शिरूर, जि.पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजबजलेल्या बाजारपेठेतील सराफ दुकानातच चोरी झाल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपी महिलांचा शोध घेऊन चोरीचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.






