पुणे: पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. दिगंबर उर्फ दिग्या दशरथ शेंडकर (वय 28, रा. चांबळी, ता. पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, दिग्या शेंडकर याच्याविरुद्ध शिरूर, सासवड आणि जेजुरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, मारहाण आणि आर्म ॲक्टअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत. ऑक्टोबर 2025 मध्ये बेलसर येथील एका व्यक्तीला ट्रान्सफॉर्मर बंद न केल्याच्या कारणावरून लोखंडी रॉड आणि कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

त्यानंतर मार्च 2026 मध्ये सोनोरी येथील एका हॉटेल व्यावसायिकाच्या हॉटेलमध्ये घुसून त्याने साथीदारांसह मारहाण केली आणि काउंटरमधील 32 हजार रुपये जबरदस्तीने नेल्याचा आरोप आहे. याच व्यावसायिकाकडून यापूर्वी अडीच लाख रुपयांची खंडणी उकळल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे.
याशिवाय शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेतील वादातून एका व्यक्तीवर पिस्तुलातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.
दिग्या शेंडकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, आर्म ॲक्ट आणि मोक्कासह एकूण 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सतत वेशांतर करून आणि ठिकाणे बदलत राहत असल्याने पोलिसांना चकवा देत होता.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सासवड परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याची अधिक चौकशी सुरू असून त्याच्या इतर गुन्हेगारी संबंधांचाही तपास केला जात आहे.







