पुणे: जुन्नर तालुक्यातील आळे परिसरात लग्नाचे आमिष दाखवून एका 31 वर्षीय तरुणाची 1 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बनावट वधू, दोन महिला आणि एका मध्यस्थाविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणासाठी विवाहाचे स्थळ शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याचवेळी ओळखीतील एका मध्यस्थाने त्याचा संपर्क आळे येथील एका महिलेशी करून दिला. त्या महिलेने तिच्याकडे विवाहासाठी योग्य मुलगी असल्याचे सांगत तरुणाला भेटीसाठी बोलावले. तसेच मुलगी पाहण्यासाठी येताना मोठी रक्कम घेऊन येण्याची अटही घातली.

त्यानुसार 20 जून 2026 रोजी तरुण आपल्या नातेवाईकांसह आणि मध्यस्थासोबत आळे येथे गेला. तेथे त्याची एका तरुणीशी ओळख करून देण्यात आली. दोघांची भेट झाल्यानंतर त्याच दिवशी घरात साध्या पद्धतीने माळा घालून विवाह लावण्यात आला. या विवाहासाठी संबंधित महिलांना आणि मध्यस्थांना ऑनलाइन पद्धतीने 1 लाख 60 हजार रुपये देण्यात आले.
यानंतर तरुण त्या तरुणीला घेऊन आपल्या गावी गेला. दुसऱ्या दिवशी दोघांनी कोपरगाव तालुक्यातील एका मंदिरात जाऊन पुन्हा विवाह केल्याचे सांगितले जाते. मात्र सायंकाळी घरी परतल्यानंतर घराबाहेर उभी असलेल्या काळ्या काचा असलेल्या कारमध्ये ती तरुणी बसली आणि काही क्षणांत तेथून पसार झाली.
तरुण आणि त्याच्या मित्रांनी संबंधित वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र कार वेगाने निघून गेल्याने त्यांना यश आले नाही. त्यानंतर तरुणाने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तपासात हा संपूर्ण प्रकार फसवणुकीचा असल्याचे समोर आले असून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







