बारामती: बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील कारभाराबाबत आलेल्या तक्रारीनंतर राज्य शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ८ जून रोजी रुग्णालयाला अचानक भेट देऊन कामकाजाची पाहणी केल्यानंतर अवघ्या १६ दिवसांत अधिष्ठात्यासह काही प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने २३ जून रोजी यासंदर्भातील शासन आदेश जारी केले. त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नव्या अधिष्ठात्याची नियुक्ती होईपर्यंत महाविद्यालयातील शरीरशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. अंजली पाटील यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

याशिवाय प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे यांची बदली करण्यात आली असून शल्यचिकित्सा विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. मंजुषा लिटके यांची पुणे येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. किरणकुमार जाधव यांची बदली करण्यात आली आहे.
बारामती येथील रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी विविध विभागांची पाहणी करत रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता. काही ठिकाणी आढळलेल्या त्रुटींवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती.
या पाहणीनंतर झालेल्या बदल्यांमुळे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनात खळबळ उडाली असून, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक जबाबदारीने काम करण्याचा स्पष्ट संदेश दिला गेल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, रुग्णसेवा आणि प्रशासकीय कामकाज अधिक परिणामकारक करण्यासाठी शासनाकडून आणखी काही निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






