पुणे : वाहनावर आमदाराचा फोटो, नाव आणि अशोकस्तंभ असलेला लोगो लावून राजकीय ओळख दाखवण्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात चर्चेत आला आहे. अशा लोगोच्या माध्यमातून पोलिसांकडून व्हीआयपी सवलत मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा असून, आता पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. शहरातील विविध भागांत वाहन तपासणीदरम्यान थार, बीएमडब्ल्यू, डिफेंडर आणि फॉर्च्युनरसारख्या महागड्या वाहनांवर आमदारकी दर्शविणारे लोगो आढळून आले आहेत.

पोलिसांच्या तपासणीत काही वाहनांच्या मागील बाजूस, तर काही वाहनांच्या पुढील काचेवर महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आणि अशोकस्तंभ असलेले लोगो लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. हे लोगो वाहनांवर का लावण्यात आले, याबाबत चालकांकडे चौकशी केली असता काही जणांनी आर्थिक फायदा आणि वाहनाला विशेष वागणूक मिळावी, या उद्देशाने लोगो लावल्याचे सांगितल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. लोगो वापरण्यासाठी अधिकृत परवानगी किंवा संबंधित कागदपत्रे आहेत का, अशी विचारणा केली असता कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्याचेही आढळून आले.

१३ सप्टेंबर रोजी भोसरी वाहतूक शाखेच्या हद्दीत एका जीवघेण्या अपघाताच्या तपासणीदरम्यान एमएच ४७ व्हीयू २३९८ क्रमांकाचे वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. या वाहनाच्या मागील बाजूस महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आणि मध्यभागी अशोकस्तंभ असलेला लोगो लावण्यात आला होता. चालकाची चौकशी केली असता आर्थिक फायदा आणि व्हीआयपी सवलत मिळावी, यासाठी लोगो लावल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. तसेच लोगो वापरण्यासंदर्भात कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्याचेही चालकाने सांगितल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

वाहनावर लोकप्रतिनिधींचा लोगो लावून राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, तर अशा प्रकाराला आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे. रस्त्यावरील वाहतूक नियम सर्वांसाठी समान असताना केवळ राजकीय ओळख दाखवून वेगळी वागणूक मिळवण्याचा प्रयत्न योग्य नसल्याचे बोलले जात आहे.
वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनीही अशा प्रकारे वाहनांवर लोकप्रतिनिधींचा लोगो वापरू नये, असे स्पष्ट केले आहे. लोगोचा अनधिकृत वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. संबंधित व्यक्ती कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या जवळची असली तरी कारवाई केली जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.







