बीड: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ बजरंग सोनवणे यांचे नाव गुन्ह्यात समाविष्ट करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली असून, त्यासाठी त्यांनी केज पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन सुरू केले आहे.

विलास घुले यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेमागील मुख्य सूत्रधारांवर अद्याप कारवाई झालेली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर मारहाण करताना सौरभ बजरंग सोनवणे यांचे नाव घेत होते. त्यामुळे या संपूर्ण घटनेत त्यांची भूमिका तपासली जावी आणि त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

मृताचे भाऊ रमेश घुले यांनी दावा केला आहे की, विलास घुले यांनी जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेत असताना काही महत्त्वाची माहिती दिली होती. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनीही हल्ल्यादरम्यान सौरभ सोनवणे यांचे नाव घेतले जात असल्याचे सांगितल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या मागणीसाठी नातेवाईकांनी विलास घुले यांचा मृतदेह थेट केज पोलीस ठाण्याच्या परिसरात आणून आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत सौरभ सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व आरोपांची पडताळणी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. सध्या या प्रकरणामुळे केज परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पुढील पोलिस कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







