लोणी काळभोर, (पुणे) : शासनाकडून नव्याने सुरू करण्यात आलेले ‘महासारथी पोर्टल’, तसेच ग्रामपंचायत आणि महाविद्यालयीन स्तरावर दिलेले आयडी यामुळे राज्यातील हजारो महा ई-सेवा केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या या धोरणामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक व आर्थिक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘अखिल स्तरीय महा ई सेवा व आधार केंद्र संघटन’ आक्रमक झाले आहे.

शासनाच्या या सुशिक्षित बेरोजगारविरोधी धोरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी ‘अखिल स्तरीय महा ई सेवा व आधार केंद्र संघटन’ च्या वतीने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांना मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या बेमुदत संपाबाबतचे अधिकृत निवेदन देण्यात आले.

या धोरणाविरोधात बुधवारी (ता. 01जुलै) मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन आणि वेळ पडल्यास ‘अर्ध नग्न धरणे आंदोलन’ करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष डॉ. अमर पवार (ठाणे), कार्याध्यक्ष उमंग शहा (मुंबई) आणि सचिव विनोद तायडे (अमरावती) यांनी थेट मुख्यमंत्री, राज्यपाल आणि माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांना पत्र पाठवून आपल्या मागण्या मांडल्या आहेत.
संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्रशासनाकडून नव्याने चालू झालेली व्हॉट्सॲपवर शासकीय प्रमाणपत्र देण्याची योजना नागरिकांसाठी सोपी वाटत असली, तरी ती महा ई-सेवा केंद्र चालकांच्या मुळावर आली आहे. राज्यात आधीपासूनच अधिकृत ‘आपले सरकार सेवा पोर्टल’ अस्तित्वात आहे. असे असतानाही ग्रामपंचायत स्तरावर आणि महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र आयडी देण्यात आले आहेत. आता त्यात भर म्हणून ‘महासारथी पोर्टल’ सुरू केल्याने अधिकृत केंद्र चालकांचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडणार आहे.
राज्यातील लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी महा ई-सेवा केंद्रे उभी केली आहेत. शासनाच्या या नव्या समांतर धोरणांमुळे केंद्र चालकांच्या थेट उपजीविकेवरच कुऱ्हाड कोसळली असून, त्यांचे कुटुंब रस्त्यावर येण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल शासनाने तात्काळ घ्यावी, अन्यथा 1 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रातील केंद्र चालक मुंबईत आंदोलन छेडतील, असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.
दरम्यान, पूर्व हवेलीतील केंद्र चालकांनी लोणी काळभोर येथील अप्पर तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. हे निवेदन देताना ‘अखिल स्तरीय महा ई सेवा व आधार केंद्र संघटन’ महाराष्ट्र राज्याचे पुणे जिल्हा निरीक्षक राज गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब गायकवाड आणि सचिव गणेश ठोंबरे, राजेश केरकर, सुभाष काळभोर, समीर सावंत व इतर महा ई सेवा केंद्र सदस्य उपस्थित होते.







