पुणे: पुण्यातील फुरसुंगी परिसरात घराची चावी दरवाजाजवळ ठेवण्याची सवय एका कुटुंबाला चांगलीच महागात पडली. घराबाहेर ठेवलेली चावी वापरून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 72 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन कॉलनी परिसरात राहणारे राम प्रकाश कदम (वय 43) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. 27 जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास कुटुंबातील सर्व सदस्य घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. मात्र, घराची चावी नेहमीप्रमाणे दरवाजाजवळील बेलवर ठेवून देण्यात आली होती.

याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराबाहेर ठेवलेली चावी सहज मिळवली. त्यानंतर त्याने त्याच चावीने कुलूप उघडून कोणताही संशय न येऊ देता घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉकर फोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 72 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून तो पसार झाला.
सायंकाळी कदम कुटुंबीय घरी परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तपासणी केली असता दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी तातडीने फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. तसेच नागरिकांनी घराची चावी मॅटखाली, कुंडीत, डोअर बेलजवळ किंवा सहज लक्षात येईल अशा ठिकाणी ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा छोट्याशा निष्काळजीपणाचा फायदा चोरटे घेत असल्याने घर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.







