पुणे: पुण्यातील व्यावसायिक कुटुंबातील तरुण केतन अग्रवाल याच्या लोहगड किल्ल्यावर झालेल्या मृत्यू प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे मानले जात होते. मात्र पोलिस तपासात हे प्रकरण हत्येचे असल्याचा संशय बळावला असून, केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात आता केतनच्या कुटुंबीयांनी आणखी एक धक्कादायक दावा केला आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सुरुवातीला सियाने केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याचे सांगितले होते. त्यामुळे कुटुंबीयांनाही हा अपघात असल्याचे वाटले. मात्र तिच्या वक्तव्यांमधील विसंगती आणि वागणुकीमुळे संशय निर्माण झाला.

विशाल अग्रवाल यांच्या दाव्यानुसार, याआधीही सियाने केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी एका झाडामुळे त्याचा जीव वाचला होता. त्या घटनेनंतर सियाने आपण केतनला सर्पदंशापासून वाचवत असल्याचे सांगितले होते, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, १८ जून रोजी केतन आणि सिया लोहगड किल्ल्यावर गेले होते. त्यावेळी केतन सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळला. सुरुवातीला अपघाताचा संशय असला तरी पुढील तपासात अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या.
सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. तपासादरम्यान लोहगड परिसरात दिसलेला एक तरुण सियाचा कथित प्रियकर चेतन चौधरी असल्याचे समोर आले. दोघांचे गेल्या एका वर्षापासून प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सिया आणि चेतन यांनी कट रचून केतनला दरीत ढकलल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक पुरावे गोळा करण्यात येत आहेत.






