नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपूर खामला येथील दुय्यम निबंधक कार्यालयाला अचानक भेट देऊन कार्यालयाची झाडाझडती घेतली असता एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कार्यालयाची झडती घेत असताना बावनकुळे यांना अधिकाऱ्यांच्या ड्रॅावरमध्ये पैशांचे बंडल सापडल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

यावेळी बावनकुळे यांच्यासह पत्रकार देखील उपस्थित होते ज्यामुळे हा भ्रष्टाचार संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघड झाला. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, ‘या कार्यालयात अनेक गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. त्यामुळे मी आज इथे आलो. पुढे त्यांनी सांगितले की, ‘अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये हे पैसे कसे आले याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार असून, या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई केली जाईल.’

यावेळी त्यांनी, महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात जर कोणी पैसे मागत असेल, तर नागरिकांनी मला थेट व्हॉट्सअपवर (9049404040) कळवावं. मी स्वतः कारवाई करीन.’ असं सांगत आपला फोन नंबर माध्यमांसामोर दिला.
दरम्यान, या कारवाईबद्दल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘या कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय लोकांचे काम होत नाही. अशा तक्रारी येत होत्या प्रत्येकाकडून पाच ते आठ हजार रुपये घेतले जात होते. अनेक एजेंट येथे काम करत आहेत. अशातच जनतेला न्याय देण्यासाठी आणि पारदर्शी कारभारासाठी या कार्यालयात धाड मारल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.







