पुणे (Pune Crime News): लोहगाव येथील गाथा लॉन्समध्ये आमदार बापू पठारे (MLA Bapu Pathare) यांच्यावर झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आमदार पठारे यांना वाचवण्यासाठी पुढे गेलेल्या त्यांच्या समर्थकावर झालेल्या मारहाणीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) Ajit Pawar (NCP) पक्षाच्या पदाधिकार्यांसह 20 जणांविरूद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, शकील अजमोद्दीन शोख (वय 46, रा. गणपती हौसिंग सोसायटी, तुकारामनगर, खराडी) यांनी याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार 4 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास लोहगावमधील संत नगर येथील गाथा लॉन्समध्ये आमदार पठारे यांना धक्काबुक्की करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव परिसरात सुरु असलेल्या जलवाहिनी व सांडपाणी वाहिनीच्या अपूर्ण कामांमुळे रस्ते कामे लांबणीवर टाकावीत, असे आमदार बापू पठारे यांनी सुचवले होते. याच पार्श्वभूमीवर बंडु खांदवे व त्याचे काही समर्थक गाथा लॉन्स येथे पठारे यांना जाब विचारण्यासाठी गेले होते. तेव्हा दोन्ही गटांत वाद झाला.
वादाच्या दरम्यान, बंडु खांदवे यांनी आमदार पठारे यांना धक्काबुक्की केली. त्यांना वाचवण्यासाठी फिर्यादी शेख पुढे गेले असता, त्यांच्यावर बंडु खांदवे, शेखर मोझे व इतरांनी लाथाबुक्क्यांनी व जड वस्तूंनी हल्ला केला. या झटापटीच्या वेळी त्यांच्या गळ्यातील 2 तोळे वजनाची सोनसाखळी आणि रोख रक्कम एक हजार रुपये असा एकूण 51 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकरणी बंडु शहाजी खांदवे (रा. लोहगाव), शेखर मोझे, विलास खांदवे, कालीदास खांदवे, गणेश खांदवे, रामेश्वर पोळ, मेघराज खांदवे, प्रतीक खांदवे (रा. दादाची वस्ती), सागर करजे, ओमकार ऊर्फ ओम्या खांदवे, तुकाराम खांदवे, हरीदास खांदवे, रामदास खांदवे, मंगेश खांदवे व इतर 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.







