हडपसर, ता. २२ : हडपसर परिसरात मध्यरात्री तलवार, कोयते, कुऱ्हाड आणि दांडक्यांनी सज्ज झालेल्या तरुणांच्या टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महेश चव्हाणचा शोध घेत आलेल्या आरोपींनी रिक्षाचालक आणि त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला करत घरात घुसण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात रिक्षाचालकाचे वडील गंभीर जखमी झाले असून परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद तुळजाराम बंदीछोडे (वय २८, रा. कामठे वस्ती, हडपसर) हे पत्नी व कुटुंबीयांसोबत घरी असताना त्यांचा मित्र सुमित वाघमारे याच्यावर काही जणांनी मारहाण केल्याची माहिती देण्यासाठी आला होता. त्यानंतर विनोद घराबाहेर आले असता विरसिंग टाक, बलवंतसिंग भोंड, ओंकारसिंग टाक आणि त्यांच्या चार ते पाच साथीदारांनी तेथे धडक दिली.

“महेश चव्हाण कुठे आहे?” असा सवाल करत आरोपींनी विनोद यांच्याशी हुज्जत घातली. “तो तुमचाच मित्र आहे, मला माहिती नाही,” असे उत्तर दिल्याने आरोपी संतप्त झाले. त्यानंतर विनोद यांना मारहाण करण्यात आली. प्रतिकार केल्याचा राग मनात धरून ओंकारसिंग टाक याने धारदार लोखंडी हत्याराने त्यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विनोद यांनी हात आडवा केल्याने मोठा अनर्थ टळला.
जीव वाचवण्यासाठी विनोद घरात पळून गेल्यानंतर आरोपींनी घरावर दगडफेक सुरू केली. कोयते, तलवारी आणि कुऱ्हाडीने दरवाजा फोडून आत घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता घरासमोर उभी असलेली एमएच-१२ क्रमांकाची रिक्षा फोडून नुकसान करण्यात आले. गोंधळ शांत झाला असे समजून विनोद यांचे वडील तुळजाराम बंदीछोडे यांनी घराचे दार उघडून बाहेर पाहिले असता, दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्या डोक्यावर धारदार हत्याराने सपासप वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ घरात ओढून सुरक्षित करण्यात आले.
आरडाओरडा ऐकून शेजारी मदतीसाठी धावून आले. मात्र आरोपींनी हत्यारे हवेत फिरवत, “जो आमच्या गँगला नडतो त्याला आम्ही तोडतो,” अशी धमकी देत लोकांच्या अंगावर धाव घेतली. त्यामुळे नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी घरांचे दरवाजे बंद करून घेतल्याचे सांगण्यात आले. घटनेदरम्यान ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांचे वाहन दिसताच आरोपी पळून जाऊ लागले. यावेळी बलवंतसिंग भोंड हा पळून जाण्याच्या प्रयत्नात कट्ट्यावरून खाली पडून जखमी झाला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले, तर इतर आरोपी फरार झाले.
या प्रकरणी विनोद बंदीछोडे यांच्या फिर्यादीवरून विरसिंग टाक, ओंकारसिंग टाक, बलवंतसिंग भोंड आणि त्यांच्या अन्य साथीदारांविरोधात खुनाचा प्रयत्न, दंगल, दहशत निर्माण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे आदी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. हडपसर परिसरात घडलेल्या या थरारक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, ‘गँग संस्कृती’ पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.







